Tuesday, 17 September 2019

आंतरराष्ट्रीय विमानतळ - खेडचा धडा काय सांगतो ?

शेवटचा भाग ४

आंतरराष्ट्रीय विमानतळ - खेडचा धडा काय सांगतो ?



विमानतळ उभारणीचे संकेत मिळताच कोचीन आणि परिसरातदेखील मोठे वादळ उठले होते. आज पुरंदरमध्ये विमानतळ उभारणीची चर्चा सुरु होताच इथेही मोठी चुळबुळ पाहायला मिळत आहे. विमानतळाची घोषणा होण्यापूर्वी सर्वपक्षीय लोकांनी त्याचे स्वागत केले. याउलट गावागावातील स्थानिक राजकारणी, जमिनीचे दलाल, एजंट, गावकारभारी यांनी विरोधासाठी भलतीच उचल खाल्ली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एरव्ही एखाद्या शेतकऱ्याने जमीन विकायला काढल्याचे कळताच त्याच्याकडे खेटे घालू लागणारे बरेचसे एजंट आता विमानतळाला विरोधाच्या भूमिकेत आहेत. गावागावात जाऊन विमानतळाला विरोध करण्यासाठी लोकांना ही मंडळी प्रवृत्त करीत असल्याची चर्चा आहे. कोची आणि पुरंदर या दोनही ठिकाणी प्राथमिक स्थिती अशीच होती काय ? तर याचे उत्तर होय असे आहे. या विरोधामागील नक्की मानसिकता काय असावी यासारखे अनेक प्रश्न उभे राहतात. त्याचे उत्तर सरंजामशाहीच्या उदरात दडलेले आहे.  

जुन्या काळात सरंजामशहा आर्थिक संपत्तीच्या दृष्टीने समृद्ध असायचे. गावात एखादाच कोणीतरी गर्भश्रीमंत असायचा. बाकी सगळे गलितगात्र असायचे. त्यामुळे सरंजामशहा सांगेल तीच पूर्वदिशा हे सर्वसाधारण सूत्र असायचे. सर्वसामान्यांच्या समृद्धीची सर्व दारं या लोकांनी बंद करून ठेवलेली असायची. साधारण लोक त्यांच्या पोलादी टाचेखाली भरडून निघायचे. गरिबांच्या घरात उन्नती किंवा प्रगती म्हणजे या सरंजाम लोकांसाठी भयानक संकट. अगदी ब्रिटीश काळापर्यंत ही मानसिकता जशीच्या तशी होती. या लोकांच्या दृष्टीने इतर गरिबांनी शिक्षण घेणे म्हणजे भयानक पाप होते. ते सुशिक्षित झाले तर आपली दुकानदारी कशी चालणार? मग आपल्या भूमिकेला लोकांच्या प्रक्षोभाचा, त्यांच्या भावनिकतेचा मुलामा देऊन हे बहाद्दर सर्वसामान्यांना बिथरून टाकत. खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर श्रीमंतीची एकाधिकारशाही हळूहळू मोडीत निघाली. सरंजामशाही संपली असे छातीठोकपणे म्हणता येणार नाही पण तिचे स्वरूप बदलले. फारतर राजेशाहीच्या काळातील सरंजामशाही आणि लोकशाहीतील सरंजामशाही अशी तिची वर्गवारी करता येईल. लोकशाही पद्धतीने सत्ता हातात असलेला एक वर्ग काहीसा त्याच पद्धतीने वर्तन करत असतो. अलीकडच्या काळात जमीन खरेदी-विक्री, दलाली अशा व्यवसायातून मिळालेल्या मायेनेसुद्धा अनेक सरंजाम जन्माला घातले आहेत. रिअल इस्टेटमधून मिळालेल्या पैशाने समृद्ध झालेला हा वर्ग आता गावकारभाऱ्यांच्या भूमिकेत आहे. स्वहितापलीकडे समाजाचा विचार करताना ते फारसे कधीच दिसणार नाहीत. मात्र आपल्या भूमिकांना तत्वांचा मुलामा चढवून लोकांना जनहिताच्या प्रकल्पांना विरोध करायला भाग पाडणारे हे महाभाग विकास प्रक्रियेत अडथळा बनू पाहतात. हा धोका वेळीच लक्षात घेणे गरजेचे आहे. रिअल इस्टेटच्या माध्यमातून नवश्रीमंत वर्गात पाउल ठेवलेले हे लोक आता प्रकल्पाला विरोध करू पाहतात. त्यांचा विरोध अंतर्मनातून असतोच असे नाही. वास्तविक त्यांना एका वेगळ्याच भयाने पछाडलेले असते.

सरंजामी वृत्तीच्या लोकांना आपल्या आजूबाजूचे सर्वसाधारण लोक प्रगतीच्या दिशेने झेपावलेले सहन होत नाही हे युगानुयुगाचे वास्तव आहे. मग कोचीन असो अथवा पुरंदर. प्रगतीच्या वाटेतील पुढारी, दलालएजंटांची सर्वत्र अस्वस्थता तीच. विमानतळ बाधितांना विकासाची संधी निर्माण होणार, सामान्यांच्या घरात पैसा खुळखुळणार, परिसराचा कायापालट होणार, जमिनींचे भाव गगनाला भिडणार म्हणून त्यांचा पोटशूळ उठला तर नवल नाही. बाजारभावाच्या चारपट पैसा, कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी, करोडो रुपये किमतीचा परताव्याचा भूखंड या गोष्टींमुळे शेतकरी श्रीमंत होणार आणि गावात आपल्या श्रीमंतीला, सत्तास्थानाला आव्हान निर्माण होणार या भयाने एजंट आणि दलाल विरोधाचा झेंडा उभारून सुसाट सुटतील यात शंका नाही. पण स्थानिक शेतकऱ्यांनी हा कावा ओळखला तरच पुढच्या पिढ्या विकासाच्या वाटेवर चालतील. अन्यथा लबाडांची मुलं पिढ्यान-पिढ्या प्रगती साधतील आणि बिचाऱ्या शेतकऱ्याची मुलं फी वाचून शेतकरीच राहतील. राजगुरूनगर मधून विमानतळाचे झालेले स्थलांतर याच विघ्नसंतोषीपणाचा परिपाक आहे. आता विमानतळ पुरंदरला गेल्यावर ते आमच्याकडेच करा अशी मागणी करणारे दीडशहाणे आता चांगलेच तोंडघशी पडले आहेत. खेड आणि पुरंदर यात पाण्याची उपलब्धता, मानव विकास निर्देशांक, औद्योगिक प्रगती, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती यात जमिन-अस्मानाचे अंतर आहे. विमानतळ गेल्याने राजगुरुनगरच्या शेतकऱ्यांना भलेही फारसा फरक पडणार नाही पण पुरंदरसारख्या दुष्काळी भागाला हे नुकसान कधीच परवडणार नाही. 

समाप्त ...........                 (शब्दांकन - माणिक निंबाळकर)



  

No comments:

Post a Comment