Monday, 16 September 2019

प्रचंड इच्छाशक्तीमुळे साकारले कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ (भाग-३)


भाग ३
प्रचंड इच्छाशक्तीमुळे साकारले कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ





      हुडकोचे कर्ज आणि केरळ सरकारचे १ कोटीचे अर्थसहाय्य यामुळे एप्रिल १९९५ पर्यंत कुरियन आणि त्यांच्या टीमला चांगला दिलासा मिळाला. भूसंपादन आणि धावपट्टीची निर्मिती अशा दोन्ही आघाड्यांवर प्रकल्प पुढे जायला सुरवात झाली. भूसंपादन पूर्ण होण्याआधीच साडेतीन किलोमीटरच्या धावपट्टीचे टेंडर काढण्यात आले. ही धावपट्टी आजही दिल्ली विमानतळानंतर दुसऱ्या क्रमांकाची लांब मानली जाते. भूसंपादनाआधीच धावपट्टीचे टेंडर काढणे हा मोठा धोका कुरियन यांनी पत्करला होता. पण कुठेतरी त्यांना मनोमन एका गोष्टीची खात्री होती की टेंडर काढले म्हणजे आपण प्रकल्पाच्या परतीचे दोर कापत आहोत. प्रकल्पाचा गाशा गुंडाळला जाण्याची शक्यता त्यामुळे पार संपली. के. एम. सी कन्सट्रक्शन्स लिमिटेड नावाच्या कंपनीला धावपट्टीचे काम ७२ कोटी रुपयांना बहाल करण्यात आले. मान्सून आणि वादळी परिस्थितीमुळे वर्षभरात केवळ सहा महिनेच काम होऊ शकले. त्यातच संपूर्ण जमिनीचा अद्याप ताबा मिळाला नसल्याने तुकड्या तुकड्यात काम करणे भाग पडले. मात्र अब्राहम जोसेफ यांच्या नेतृत्वाखालील कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑथोरीटी लिमिटेडच्या (सीआयएएल) टीमकडून मिळालेल्या भरभक्कम पाठींब्यामुळे रात्रंदिवस काम करून ठेकेदाराने काम वेगाने पुढे नेले. टर्मिनल बिल्डींग आणि एअर ट्राफिक कंट्रोल टॉवरच्या कामाला १९९६ च्या सुमारास सुरवात करण्यात आली. राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या तज्ञांनी श्री. एन. यु. भास्कर राव यांच्या नेतृत्वाखाली स्वतःला झोकून दिले. माहिती तंत्रज्ञान आणि टेलिकॉम नेटवर्कची जबाबदारी श्री. सुंदर रामन याच्याकडे तर यांत्रिकी विभागाची धुरा श्री. गणेशन या नामवंत अभियंत्याने सांभाळली. विमानतळ डिझाईन आणि बांधकाम यावर स्वत : कुरियन बारीक नजर ठेऊन होते. दर बुधवारी आणि शुक्रवारी आढावा बैठका घेऊन ते सर्व विभागप्रमुखांना कामाला जुंपत. कामाच्या बाबतीत तत्काळ आणि कठोर निर्णय घेताना त्यांनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. इतर सर्व विषय कुरियन यांनी स्वतःच्या खांद्यावर घेत केवळ तांत्रिक आणि प्रत्यक्ष प्रकल्पस्थळावरील बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारी टीमवर दिली. १९९६ च्या उत्तरार्धात श्री. इ. के. नयनार यांच्याकडे केरळच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आली. कोचीन विमानतळ प्रकल्पाला संपूर्ण सहकार्याची भूमिका त्यांनीही कायम ठेवली. १९९७ मध्ये पुन्हा वाटाघाटी करून काही जागेचा ताबा टीमने घेतला. यावेळी जमीन मालकांचा विशेष विरोध नसला तरी भूसंपादनाची स्थिती चिंताजनक अशीच होती. पहिल्या टप्प्यातील अनेक जमीन मालकांनी अद्याप ताबा सोडला नव्हता. काहींनी संपादन प्रक्रियेला कोर्टात आव्हान दिले. ४०० पेक्षा अधिक खटले सीआयएएल वर कोर्टात दाखल झाले. त्याचा कामाच्या वेगावर परिणाम झाला. एका प्रकरणात तर कोर्टाने संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया रद्दबातल ठरवून प्रकल्पाला मोठा दणका दिला. पण सीआयएएलच्या टीमने सर्व केसेसचा धैर्याने सामना केला. अगदी सर्वोच्च न्यायालयातील खटलेही यशस्वीरीत्या जिंकले. १९९८ नंतर वेगवेगळ्या कामांसाठी १०० हून अधिक ठेकेदार घड्याळाच्या काट्याप्रमाणे चौफेर काम करत होते. निधीची अडचण असली तरी ठेकेदारांची आणि सामग्री पुरवठादारांची बिले वेळेवर काढण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली गेली. पाच वर्षाच्या कालावधीत सीआयएएलने तीन हवाई वाहतुक मंत्री, चार प्रधान सचिव, एअरपोर्ट ऑथोरीटी ऑफ इंडियाचे चार चेअरमन, केरळ राज्याचे तीन मुख्यमंत्री, चार परिवहन मंत्री, पाच सचिव अशा असंख्य लोकांना तोंड देत काम पाहिले. विविध यंत्रणांच्या समन्वयातून हा महाकाय प्रकल्प मार्गस्थ होऊ लागला. 

    आणि तो दिवस उजाडला ...

            जानेवारी १९९९ च्या सुमारास प्रकल्प पूर्णत्वाकडे झुकला. २५ मे १९९९ रोजी महामहीम राष्ट्रपती के. आर. नारायणन, केरळचे राज्यपाल श्री. सुखदेव सिंग, मुख्यमंत्री श्री. इ. के. नयनार, केंद्रीय विमान वाहतूक मंत्री अनंत कुमार व अनेक उच्चपदस्थांच्या उपस्थित या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर १० जून १९९९ रोजी एअर इंडियाच्या दमन ते कोचीन या विमानाने पहिले उड्डाण केले. या रोमांचक क्षणाचे दृश्य आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी नागरिकांनी विमानतळावर तोबा गर्दी केली. २० हजार रुपयांच्या भांडवलापासून सुरु झालेले, उसनवारीतल्या फर्निचर-संगणकावर काम करून अवघ्या ३०० कोटी रुपयात उभे राहिलेले हे विमानतळ म्हणजे एक रोमहर्षक कथाच होती. उत्तुंग स्वप्न उराशी बाळगून आपले करिअर पणाला लावणाऱ्या कुरियन यांच्यासह त्यांची टीम आणि त्यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वच मान्यवरांचे या प्रकल्पातील योगदान कधीही विसरता येणार नाही.

      कोचीन हे केवळ एक आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही तर ते दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतिक आहे. एखाद्याने आपला जीव एखाद्या महान कार्यात ओतला तर काय चमत्कार घडू शकतो त्याचे जीतेजागते उदाहरण म्हणजे कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ.    

 क्रमश  :                                  (शब्दांकन - माणिक निंबाळकर)




No comments:

Post a Comment