Tuesday, 29 January 2019

सूर्य तर मावळले .... पुढे काय ?


                                             

          
      ज्यांच्याकडे पाहून गेल्या शतकाच्या अखेरच्या काही वर्षात राजकारणाची उमेद जागृत झाली त्या मोजक्या नेत्यांपैकी अखेरचा नेता आज हरपला. ज्या लोकांना बघुन राजकारणाची प्रेरणा मिळाली ते एक एक करून चालू पंगतीतून अचानक उठून जावेत तसे गेले. आधी बाळासाहेब, मग अटलजी आणिआता जॉर्ज फर्नांडीस. हिमालयाच्या उंचीची ही प्रखर राष्ट्रभक्त मंडळी नेहमीच माझ्या कुतुहलाचा विषय होती. त्यांच्या आचार विचारांचा संग्रह सतत गाठीशी ठेवून माझ्यासारख्या अनेकांनी आपली राजकीय आणि सामाजिक वाटचाल आरंभली.

    मंगळूरमधून आलेला एक युवक मुंबईकरांच्या गळ्यातील ताईत बनला. कामगार, कष्टकरी वर्गाचा आधारवड झाला. धनदांडग्यांच्या नाही तर श्रमिकांच्या घामाने, निष्ठेने त्याला नेता बनवले. पंडित नेहरूंचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या स. का. पाटलांच्या विरोधात त्याने दंड थोपटले. स.का. पाटलांना पराभूत करण्यासाठी जे तंत्र त्यांनी अवलंबले ते तर अफलातून होते. ‘होय, तुम्ही स.का पाटलांना पाडू शकता या एकाच आशयाचे फलक आणि बॅनर मुंबईभर लावून त्यांनी मतदारांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. अखेरीस निवडणुकांचे निकाल लागले आणि एक अशक्यप्राय वाटणारा विजय जॉर्ज फर्नांडीस यांनी संपादन केला.  या निवडणुकीने फक्त स.का पाटील पराभूत झाले असं नाही तर या निवडणुकीने भारतीय राजकारणातील एक प्रामाणिक, इमानदार आणि पारदर्शी नेत्याला जन्माला घातले. संरक्षणमंत्री असतानाही स्वतःचे कपडे स्वतः धुणाऱ्या या नेत्याच्या कपड्याला शेवटपर्यंत इस्त्री लागली नाही. स्वतःच्या हाताने स्वच्छ धुतलेले साधारण कपडे हीच त्यांची अखेरपर्यंत ओळख होती. वास्तविक या कपड्यांना संघर्षाची किनार होती, दिनदुबळ्यांच्या घामाचा दर्प होता. गेली अनेक वर्ष मी युट्युब व अन्य माध्यमात त्यांची लोकसभेतील भाषणे, त्यांचे जीवनमान, राहणीमान, कार्यकर्तुत्व याविषयी ऐकत आलो आहे. वाजपेयी,जॉर्ज, बाळासाहेब ही मंडळी वार्धक्यामुळे राजकारणातून बाजूला पडली तरी त्यांची मनातली जागा कधीच कोणी घेऊ शकला नाही.

      अलीकडच्या काळात तत्वहीनता, चिखलफेक, तू तू-मै-मै यामुळे राजकारणाची परिप्रेक्षा इतकी आकुंचन पावली आहे की त्यात जीव गुदमरायला होतो. मी तर केवळ दहा वर्ष तेही पडद्याआडच्या राजकारणात आहे. तरीही अनेकदा राजकारणाचा तिटकारा येतो. पण या लोकांची नुसती आठवण पुन्हा लढायची उर्जा मिळवून देते. लोककल्याणाच्या एका विशिष्ट ध्येयासाठी पुन्हा प्रवाहात झोकून द्यायची प्रेरणा मला या लोकांच्यामुळे मिळत गेली. धीर-गंभीर आवाजातील त्यांची एक-एक निश्चयी वाक्ये कधी कधी मला मध्यरात्रीच्या झोपेतसुद्धा जागी करतात. जवानांच्या शवपेटीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत कॉंग्रेसने फर्नांडीस यांच्यावर संसदेत बहिष्कार घातला होता. ते बोलायला उभे राहिले की कॉंग्रेस वॉक आउट करत असे. हा सगळा प्रकार फर्नांडीस यांना इतका जिव्हारी लागला होता की इतका करारी माणुसही एकदा संसदेत बोलताना ढसढसा रडू लागला. जॉर्जकडून अनावधानाने एखादी चूक होऊ शकते पण भ्रष्टाचाराचा ‘भ्र’ सुद्धा होऊ शकणार नाही इतक्या निर्मळ मनाचा हा माणुस होता. कॉंग्रेसच्या या भुमिकेबद्दल एकदा खुद्द बाळासाहेबांनी एका कार्यक्रमात शरद पवारांचे कान उपटले होते. संरक्षणमंत्री म्हणून त्यांना मिळालेल्या अवाढव्य बंगल्यात स्वतःच्या कामकाजासाठी एक खोली सोडली तर बाकी सगळ्या बंगल्याचा ताबा त्यांनी दिल्लीत शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना दिला होता. अनेक विद्यार्थी त्यांच्या बंगल्यावर राहून अभ्यास करून मोठे झाले. मंगळूरमधून आलेला एक युवक पुढे मुंबईत स्थिरावतो काय, तिथे अधिराज्य गाजवतो काय आणि नंतर बिहार आणि राष्ट्रीय राजकारणात पाय रोवतो काय हा सगळा प्रवास अद्भुत असाच म्हणावा लागेल.

         जॉर्ज गेले पण त्यांच्या जाण्याने एक मुलभूत प्रश्न आज सबंध हिंदुस्थानच्या युवा वर्गासमोर आ वासून उभा राहिला आहे. हा प्रश्न मनाला व्याकुळ करणारा आहे. माझ्या पिढीतील अनेक युवकांनी वाजपेयी, बाळासाहेब, फर्नांडीस पाहिले आहेत. त्यातल्या अनेकांनी केवळ पाहिले आहेत पण अनुभवले नाहीत. पण ज्यांनी ही उत्तुंग व्यक्तिमत्व पाहिलीही नाहीत आणि अनुभवलीसुद्धा नाहीत त्यांचे काय ? सूर्य तर मावळलेत. ताऱ्यांच्या प्रकाशात वाटा धुंडाळण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर उभे ठाकले आहे. भळभळती जखम ही आहे की, आजच्या राजकारणात असे सूर्य तर सोडा, पण तारे तरी आहेत काय? सोशल मिडीयाछाप आजच्या छचोर राजकारणाने पुढाऱ्यांच्यात संघर्ष आणि कर्तुत्वाशिवाय पदे मिळवण्याच्या राक्षसी महत्वाकांक्षा इतक्या बळावून ठेवल्या आहेत की त्यापुढे देशहीत, समाजहीत गौण ठरत आहे.  

कुणाच्या तोंडाकडे पाहून युवकांनी राजकारणात यावं हा एक मन सुन्न करणारा प्रश्न आहे. आमच्या पिढीतील युवकांच्या मनात वाजपेयी, जॉर्ज आणि बाळासाहेबांच्या पवित्र आठवणी आणि त्यांचे विचार आयुष्यभर धुमाकूळ घालत राहतील एवढे मात्र नक्की.   

- माणिक निंबाळकर  (मो.नं  8390779117)