![]() |
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भगवा फडकल्यानंतर आनंद साजरा करताना शिवसैनिक |
पुरंदर तालुक्यातील जिल्हा
परिषद आणि पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला मतदारांनी
अनपेक्षितपणे हिसका दाखवल्यामुळे कॉंग्रेसजन चांगलेच गांगरले आहेत. सासवड आणि
जेजुरीची नगरपालिका जिंकल्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत विजयी घोडदौड
कायम ठेवून तालुक्यात आपल्या विजयाचा वारू उधळणार अशी आशा कॉंग्रेसला होती. मात्र
मतदारांनी ती साफ धुळीस मिळवली.
अवघ्या दोन महिन्यापूर्वी
पार पडलेल्या सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनाप्रणीत लोकमित्र जनसेवा आघाडीने
कॉंग्रेसला रडकुंडी आणले होते. आपले लक्ष्य मर्यादित ठेवत शिवतारेंनी स्वतःला केवळ
सासवडमध्ये गुंतवून ठेवले. शिवसेनेने सासवड ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला. केवळ
१५६ मतांनी शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. राजेश दळवी यांचा पराभव झाला.
सासवड शहरातील जवळपास १५०० बोगस मतदान आणि शेवटच्या टप्प्यातील ध्रुवीकरणामुळे
कॉंग्रेसला कशीबशी आपली लाज राखता आली. निवडणूक ऐन रंगात आलेली असताना कॉंग्रेसचे
नेते आणि माजी आमदार चंदुकाका जगताप यांनी शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ.
राजेश दळवी यांना एका कार्यक्रमात बुक्का मारला. ही गोष्ट वाहिन्यांच्या
कॅमेऱ्यावर स्पष्टपणे सबंध महाराष्ट्राने पाहिली. दिलगिरी व्यक्त करून या विषयावर
पडदा टाकण्याचा सरळसोपा मार्ग उपलब्ध असताना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि चंदुकाका
जगताप यांचे पुत्र संजय जगताप यांनी या प्रकरणात ‘वडिलांनी कौतुकाने थाप मारली’
असा अजब दावा केला. त्यावर लोक फिदीफिदी हसू लागल्यावर चुकून धक्का लागला असाही
दावा केला गेला. नंतर तर दळवी यांचाच पाय काकांना लागला अशी मल्लीनाथी करण्यात
आली. प्रश्न उगारलेल्या हाताचा आणि मारलेल्या धक्क्याचा असताना सारवासारव हास्यास्पदरित्या
पायाच्या बाबतीत चालली होती. नंतर माध्यमांच्या प्रतिनिधींवरच आरोप करण्यापर्यंत
मजल त्यांनी मारली.
- माणिक निंबाळकर
